गणेशोत्सव : अंबाजोगाईतील नागरिकांनी शांततेचा वारसा जतन करण्याचा प्रयत्न करावा

बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे आवाहन

अंबाजोगाई  : गणेशोत्सव काळात अंबाजोगाई शहरातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकत्रित येऊन शहराच्या शांततेचा वारसा जतन करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले.

आगामी गणेशोत्सवाचे औचित्य साधुन बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करत असताना नंदकुमार ठाकूर बोलत होते. 

या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक पंकज कुमावत, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीस जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, राजेसाहेब देशमुख, सुनिल लोमटे, नगरसेवक शेख रहीम, अ‍ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅड. इस्माईल गवळी, अकबर पठाण, उमाकांत शेटे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना नंदकुमार ठाकूर पुढे म्हणाले की, गणेशोत्सव हा सण सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन साजरा करावयाचा सण असून या

कालावधीमध्ये गणेशासमोर आरास करत असताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. सर्वांनी समाज प्रबोधनपर देखावे सादर करून शहराच्या शांततेचा वारसा जतन करण्याचा प्रयत्न करावा.

यावेळी जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, राजेसाहेब देशमुख यांच्यासह शहरातील विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवुन मौलिक सूचना केल्या.

या शांतता समितीच्या बैठकीचे सुत्रसंचालन पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केले. बैठकीस सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, सर्व पत्रकार बंधु, तहसील कार्यालय, नगर परिषद, महावितरणचे प्रतीनिधी उपस्थित होते.