34 कोटी ठेवींचा टप्पा गाठणारी योगेश्वरी नागरी ही अंबाजोगाईतील पहिली पतसंस्था
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात 30 वर्षांपुर्वी स्थापन झालेल्या व सहकार क्षेत्रात नांवारूपास आलेल्या योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेने सुमारे 34 कोटी 23 लक्ष रूपयांहून अधिकच्या ठेवी जमवत ठेवीदार, सभासदांचे सहकार्य व विश्वासावर पतसंस्थेची दमदार वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्यांसाठी भक्कम पाठबळ देणारी व एक आधारवड बनलेली ही पतसंस्था नवउद्योजकांसाठी आशेचा किरण बनली आहे. अंबाजोगाईच्या अर्थकारणाला गती व बळकटी देण्याचे काम योगेश्वरी नागरी पतसंस्था करीत आहे. अंबाजोगाईच्या सहकार क्षेत्रात 34 कोटींहून अधिकचा टप्पा गाठणारी योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था ही अंबाजोगाईतील पहिली पतसंस्था ठरली असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन माणिकराव वडवणकर यांनी दिली आहे.
योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 21 सप्टेंबर शनिवार रोजी लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन माणिकराव वडवणकर तर व्यासपीठावर पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी, संचालक कचरूलाल सारडा, ब्रह्मचारी इंगळे, सुनिलराव वाघाळकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती. अहवाल वाचन करताना चेअरमन माणिक वडवणकर यांनी सर्वप्रथम सभासदांनी वेळोवेळी केलेले सहकार्य व संचालक मंडळावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले.
वडवणकर बोलताना म्हणाले की,‘सहकाराचे तत्व स्वयंरोजगाराला महत्व’ हे ब्रीद घेवून व धोरण ठेवून सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेने सुरूवाती पासूनच बचतीच्या माध्यमातून लघु उद्योगांसाठी कर्ज देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम केले आहे. ही पतसंस्था आज अंबाजोगाई शहराच्या व परिसरातील नागरिकांसाठी एकप्रकारे आधारवडच ठरली आहे. सन 1989 साली ही पतसंस्था अत्यल्प भागभांडवलावर सुरू झाली. तिचे आज ख-या अर्थाने वटवृक्षात रूपांतर झाले आहे. नुकतेच पतसंस्थेने स्थापनेचे 30 वे वर्ष पुर्ण केले आहे, हे सांगत वडवणकर म्हणाले की, 31 मार्च 2019 अखेर पतसंस्थेची सभासद संख्या 2522 इतकी असून सभासद भागभांडवल 2 कोटी 21 लाख, स्वनिधी 5 कोटी 05 लाख एवढा आहे. पतसंस्थेकडे 34 कोटी 23 लाखांहून अधिकच्या ठेवी आहेत. पतसंस्थेने 18 कोटी 57 लाखांहून अधिकचे कर्ज वाटप केले आहे. तर 25 कोटी 66 लाख रूपयाहून अधिकची गुंतवणुक केली आहे. पतसंस्थेला 31 मार्च 2019 अहवाल वर्षा अखेर 30 लाख 22 हजार रूपयांहून अधिकचा निव्वळ नफा झाला आहे. यावेळी पतसंस्थेच्या वतीने 6 टक्के लाभांश जाहिर करण्यात आला अशी माहिती वडवणकर यांनी दिली.
पतसंस्थेच्या 30 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस पतसंस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार,हितचिंतक, ग्राहक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सभेचे सुत्रसंचालन आनंद टाकळकर यांनी करून उपस्थितांचे आभार व्यवस्थापक गजानन कुलकर्णी यांनी मानले. सभेच्या व्यवस्थेसाठी पतसंस्थेचे लेखापाल संतोष मठपती, नारायण हाके, कु.सिमा मुळे, दिपक आदमाने, आर.जी. वाघमारे, अनिकेत पानकोळी, रूपेश कोकाटे, सागर कंगळे, शिवराज काटे, पिग्मी प्रतिनिधी राम भस्मे, विजय गजरे, प्रकाश कदम, सतिष मठपती, विशाल देशमुख, अजय रापतवार यांनी पुढाकार घेतला.