बीड जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे अपघाती निधन

रायगड : रविवारी सकाळी एक दुःखद बातमी समोर आली आहे. शिवसंग्रामचे नेते तथा माजी आमदार विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अपघात एवढा भीषण होता की, मेटे यांच्या कारचा चक्काचूर झाला होता.

अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नाही, अशी माहिती मिळतेय. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एमजीएमला पोहोचले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर रूग्णालयात पोहोचले.

विनायक मेटे ‌‌यांचा जीवनप्रवास 

विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे मेटे अध्यक्ष देखील होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी असलेले मेटे सर्वप्रथम शिवसेना – भाजप युती सरकारच्या काळात आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्यही होते.