यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी घेतला पुढाकार
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी विद्यार्थी सरसावले असून आज दिनांक 13 ऑगस्टला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आद्यकवी मुकुंदराज आणि हत्तीखाना परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसराची स्वच्छता केली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘ऐतिहासिक वारसास्थळ जतन’ अभियानातंर्गत आद्यकवी मुकूंदराज स्वामी समाधी, हत्तीखाना परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ व कार्यक्रमाधिकारी डॉ. इंद्रजीत भगत यांनी या अभियानाच्या सुरुवातीला तिरंगा झेंडा विद्यार्थ्यांना देवून स्वच्छता अभियानाची सुरुवात केली.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष वारसास्थळ असून, वारसास्थळे सुरक्षित व स्वच्छ राहतील तरच देशाचा इतिहास भावी पिढीला ज्ञात होईल, असे सांगितले. स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा व गीत गात परिसरात स्वच्छता अभियान राबविले. अभियानात 37 स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
अभियानाचे नियोजन कार्यक्रमाधिकारी डॉ. इंद्रजीत भगत यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनंत मरकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले, त्यांना डॉ. दिलिप भिसे, डॉ. रोहीणी खंदारे, डॉ. मनोरमा पवार, डॉ. राजाभाऊ भगत, डॉ. नरेंद्र चोले, डॉ. अमोल सोळुंके, प्रा. लोमटे, डॉ. संजय जाधव, डॉ. वसंत गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले.