प्रियदर्शनी क्रीडा मंडळाच्या वतीने लोकनेते विलासराव देशमुख व लोकनेते बाबुराव आडसकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रंगले प्रबोधनपर कीर्तन
अंबाजोगाई : समाजाचे कल्याण करण्यासाठी अध्यात्मिक ज्ञान आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केले. ते प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने लोकनेते विलासराव देशमुख व लोकनेते बाबुराव आडसकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित ‘स्मृती सद्भावना समारोह’ प्रसंगी कीर्तन महोत्सवात बोलत होते.
याप्रसंगी मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, चंद्रशेखर वडमारे, विलास सोनवणे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते विलासराव देशमुख व लोकनेते बाबुराव आडसकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर म्हणाले की, मानवाच्या स्वअंगात देवत्व असते पण ते ओळखण्याचे ज्ञान मानवाला नाही. तसेच माणसाला आपल्या गरजा किती आहेत, याचे ज्ञान जेव्हा माणसाला होईल, तेव्हा त्याच्यात देवत्व येईल असेही इंदोरीकर महाराजांनी स्पष्ट केले.
माणसाला आयुष्यात पैसा, संपत्ती याच्यापेक्षा आपला चांगुलपणा सदैव कामी येणार असल्याचे महाराज म्हणाले. माणसाने मोह, माया याचा त्याग केला तर त्याच्यात देवत्व येऊ शकते. वृद्धाश्रम हा देशाला लागलेला कलंक आहे, अशी मार्मिक टीकाही हभप इंदोरीकर महाराज यांनी केली. तसेच सत्याचा बोध झाल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होणे, अशक्य बाब आहे, असेही त्यांनी सांगितले.
समाज प्रबोधनपर कीर्तन ऐकण्यासाठी अंबाजोगाई पंचक्रोशीतील हजारो महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.