‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘इएनटी’ विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

विभागप्रमुख, अधिष्ठातांचे अनेकांनी केले अभिनंदन 

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘इएनटी’ (नाक – कान – घसा) विभागातील पदव्युत्तर विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी दिली असून या संबंधीचे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत. 

या संदर्भात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना स्वतंत्र पत्र क्रं. एन एमसीए / एमसीआय – 811 (22)/10/2022- मेडि. / 029297 दि. 10 ऑगस्ट 2022 च्या पत्रकान्वये वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘इएनटी’ विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 3 वरुन 5 करण्यात आली आहे, असे कळवले आहे. 

2022 – 23 या नव्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘इएनटी’ विभागात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने या विभागाच्या केलेल्या तपासणीच्या 18 जुलै 2022 रोजी सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

या विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी संख्येत वाढ व्हावी, यासाठी विभागप्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे यांच्या पुढाकाराने व अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने सुचवलेल्या सर्व निकषांच्या पुर्ततेसाठी परीश्रम घेतल्यामुळे ही विद्यार्थी संख्या वाढली आहे. 

या वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता पदाचा कार्यभार डॉ. भास्कर खैरे यांनी सांभाळण्यास सुरुवात केल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनेक विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य आणि वेळेवर उपचार होण्यास मदत  होणार आहे.

या आठवड्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागात कार्यरत असलेले सहा. प्राध्यापक डॉ. अनिल मस्के यांना सहयोगी प्राध्यापक म्हणून तर मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, अ‍ॅॅनॅस्थेशिया विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यु तरकसे आणि डॉ. पडवळ यांची प्राध्यापक म्हणून पदोन्नती झाल्याने आनंदाचे वातावरण असतांनाच ‘इएनटी’ विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी संख्येत वाढ झाली, ही बातमी अधिकच आनंददायी ठरली आहे. ‘इएनटी’ विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे आणि अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.