विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई : विधिमंडळाचे सन 2022 चे पावसाळी अधिवेशन बुधवार दिनांक 17 ऑगस्टपासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दिनांक 17 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
मुंबईत विधानभवन येथे विधान सभा आणि विधान परिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनांक 17 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक 20, 21 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या बैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.