मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारनं महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भातही शिंदे सरकारनं आज मोठा निर्णय घेतला आहे. आता 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहेत.
‘मविआ’ सरकारच्या काळात वाढवलेली वॉर्डरचना रद्द करण्यात आली असून यामध्ये मुंबईतील वाढलेल्या 9 वॉर्डचा समावेश आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं सांगितलं जातंय.
‘मविआ’ सरकारने वाढविलेली वॉर्ड संख्या नियमबाह्य पद्धतीने केली असल्याने रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वॉर्ड रचना रद्द करुन ती 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली वॉर्ड संख्या ठरली होती, त्या प्रमाणे कायम ठेवण्यात येणार आहे. राज्यातील येत्या निवडणुका या जुन्याच वॉर्ड रचनेप्रमाणे घेण्यात येणार आहेत.
राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या वॉर्ड रचनेमध्येही बदल करण्यात आला होता. अनेक ठिकाणी नवीन वॉर्डची रचना करण्यात आली होती. आता ते वाढवलेले नवीन वॉर्डही रद्द करण्यात येत आहेत.