साप चावल्याने वृध्द महिलेचा मृत्यू : जोगाईवाडीत घडली घटना

अंबाजोगाई : शहरापासून जवळच असलेल्या जोगाईवाडीतील एका वृद्ध महिलेचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शकुंतला श्रीरंग ढेसले (वय 65) असं त्या मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, जोगाईवाडी येथील वृध्द महिला शकुंतला श्रीरंग ढेसले या रविवारी शेतात गेल्या होत्या. त्यांनी शेतात असलेल्या उडव्यातील गोवऱ्या काढण्यासाठी हात घालताच विषारी सापाने चावा घेतला. त्यांना अधिक उपचारासाठी ‘स्वाराती’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. साप विषारी असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात तिन मुली, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान, उडव्यातील सापापासून इतरांना धोका होऊ नये, म्हणून सर्पमित्र ॲड. लाखे यांच्या मदतीने सापाला पकडून जंगलात सोडून देण्यात आले.