शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदतीची गरज : राज्य शासनानं तत्काळ निर्णय घ्यावा – विरोधीपक्षनेते अजित पवार

जवळगाव येथे सोयाबीन पिकाची केली पवार – मुंडे यांनी पाहणी

75 हजार रुपये मदत मिळवून द्यावी : राष्ट्रवादी काँग्रेसने दिले निवेदन

अंबाजोगाई : तालुक्यातील जवळगाव येथे सोयाबीन पिकांचं गोगलगायींच्या प्रादुर्भावानं मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांना तीन – चार वेळा पेरणी करावी लागली. या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदतीची गरज असून याबाबत राज्य शासनानं तत्काळ निर्णय घ्यावा, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

विरोधीपक्षनेते अजित पवार व बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांची आज सकाळी पाहणी केली. या भागातील संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना धीर दिला.

शेतकरी बांधवांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असा शब्दही यावेळी विरोधीपक्षनेते अजित यांनी शेतकऱ्यांना दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार ‌पृथ्वीराज साठे, परळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

75 हजार रुपये मदत मिळवून द्यावी : राष्ट्रवादी काँग्रेसने दिले निवेदन

यावेळी जिल्हात अतिवृष्टीमुळे व गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह अन्य पिकांना हेक्टरी 75 हजार रूपये मदत मिळवुन द्यावी, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देण्यात आले.