सापांची पूजा करण्याऐवजी त्यांचा जीव वाचवा : सर्पमित्र धानोरकर

अंबाजोगाई : सापांची पूजा करण्याऐवजी त्यांचा जीव वाचवा. साप शेतकऱ्यांचा मित्र आहे. मनामध्ये असलेले सापाबद्दलचे गैरसमज काढून टाका, असे आवाहन योगेश्वरी नूतन विद्यालयाचे सहशिक्षक तथा सर्पमित्र हेमंत धानोरकर यांनी केले. ते योगेश्वरी नूतन विद्यालयात नागपंचमीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सापाबद्दलची सखोल माहिती देत असताना बोलत होते. 

सापाबद्दलचे समज व गैरसमज याबाबतीत त्यांनी सखोल माहिती दिली. कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापिका अपर्णा पाठक, उपमुख्याध्यापक विलास गायकवाड, पर्यवेक्षक रवी मठपती यांची उपस्थिती होती. 

हेमंत धानोरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करतात. वन विभागाला त्यांची भरपूर मदत होते. शहरात व तालुक्यात ज्या – ज्या ठिकाणी त्यांना साप पकडण्यासाठी बोलवले जाते, तेव्हा ते अगदी आवर्जून जातात. सापाला पकडून सुरक्षितरीत्या जंगलात सोडतात. त्यांनी विषारी, बिनविषारी, निमविषारी सापाबद्दल विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती दिली. धामन, तस्कर व चित्रक हे साप प्रत्यक्षात दाखवले.

विद्यार्थ्यांनी सापाची ओळख असल्याशिवाय त्याला हातात किंवा त्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करू नये, स्टंटबाजी करू नये, अथवा आपला जीव जाऊ शकतो. त्यासाठी काळजी घ्यावी, असेही आवाहन सर्पमित्र धानोरकर यांनी विद्यार्थ्यांना केले. शहरातील योगेश्वरी नूतन विद्यालयासह इतर अनेक शाळांमध्ये धानोरकर यांनी सापाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली.