टीम AM : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक असलेले मोहम्मद रफी हे गायनविश्वातील एक असं नाव आहे, ज्यांनी भारतीय चित्रपट आणि भारतीय संगीताला अशा स्थानावर नेले, ज्यांचे भारतीय चित्रपट सदैव ऋणी राहील. मोहम्मद रफी आज आपल्यात नाहीत, पण हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील अनेक संगीतकारांसाठी ते प्रेरणास्थान राहिले आहेत.
24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमध्ये एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या रफी यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. मात्र, त्यांच्या घरात संगीतमय वातावरण नव्हते. रफी यांचा संगीताकडे असलेला कल पाहून त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना उस्ताद अब्दुल वाहिद खान यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. असे म्हणतात की, रफी जेव्हा 13 वर्षांचे होते, तेव्हा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता के. एल. सहगल आकाशवाणी लाहोरमध्ये परफॉर्म करण्यासाठी आले होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी रफीही आपल्या भावासोबत गेले होते.
मात्र, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने सहगल यांनी कार्यक्रमास नकार दिला. तेव्हा रफींच्या मोठ्या भावाने आयोजकांना विनंती केली की, त्यांनी मोहम्मद रफींना गाण्याची संधी द्यावी, जेणेकरून गर्दीची चिंता शांत होईल. त्यावेळी आयोजकांना ते योग्य वाटले आणि त्यांनी रफींना कार्यक्रमात गाण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे रफींनी आपला पहिला सार्वजनिक कार्यक्रम केला. या कार्यक्रमात त्या काळातील प्रसिद्ध संगीतकार श्याम सुंदर रफींचा आवाज ऐकून मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी रफी यांना त्यांच्यासोबत काम करण्याची ऑफर दिली.
1944 मध्ये रफी साहब यांना श्याम सुंदर दिग्दर्शित ‘गुल बलोच’ या पंजाबी चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. यानंतर मोहम्मद रफी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईत स्वप्नांच्या शहरात आले. 1945 मध्ये रफी साहबनी हिंदी चित्रपटसृष्टीत ‘गाव की गोरी’ (1945) मधून ‘अजी दिल हो काबू में तो दिलदार की ऐसी तैसी’ या गाण्याने पदार्पण केले. यानंतर रफी यांना हिंदी चित्रपटसृष्टीत एकामागून एक अनेक गाणी गाण्याची संधी मिळाली. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी मराठी, तेलुगू, पंजाबी, बंगाली आणि आसामी या भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत.
मोहम्मद रफी यांना सर्वजण प्रेमाने रफी साहब म्हणून संबोधत होते. रफी साहबनी गायलेल्या काही प्रमुख गाण्यांमध्ये ओ दुनिया के रखवाले (बैजू बावरा), चौदहवीं का चांद हो (चौदहवीं का चांद), हुस्नवाले तेरा जवाब नहीं (घराना), मेरे मेहबूब तुझे मेरी मुहब्बत की कसम (मेरे मेहबूब), चाहूंगा मै तुझे (दोस्ती) छू लेने दो नाजुक होठों को (काजल), बहारों फूल बरसाओ (सूरज), बाबुल की दुआएं लेती जा (नीलकमल), दिल के झरोखे में – ब्रह्मचारी, परदा है परदा (अमर अकबर एंथनी), क्या हुआ तेरा वादा (हम किसी से कम नहीं), चलो रे डोली उठाओ कहार (जानी दुश्मन), दर्द – ए – दिल, दर्द - ए – जिगर (कर्ज), सर जो तेरा चकराए, (प्यासा), चाहे कोई मुझे जंगली कहे, (जंगली) यांसह आदींचा समावेश आहे. सन 1965 मध्ये, रफी साहब यांना गायन क्षेत्रातील त्यांच्या प्रशंसनीय योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
रफींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी दोन लग्ने केली होती. रफींच्या पहिल्या पत्नीचे नाव बसेरा होते. रफी यांना त्यांच्यापासून एक मुलगा झाला, त्याचे नाव सईद रफी आहे. पण रफींचे पहिले लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर रफींनी बिल्किस बानोशी दुसरे लग्न केले, ज्यापासून रफी यांना तीन मुले खालिद रफी, हमीद रफी, शाहिद रफी आणि तीन मुली परवीन, यास्मिन आणि नसरीन होत्या.
आपल्या गायकीमुळे हिंदी चित्रपटसृष्टीला उंचीवर नेणाऱ्या या महान गायकाचे वयाच्या 55 व्या वर्षी 31 जुलै 1980 रोजी निधन झाले. मोहम्मद रफी यांचे शेवटचे गाणे ‘आस पास’ या चित्रपटासाठी होते, त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी रेकॉर्ड करण्यात आले होते, या गाण्याचे बोल होते ‘शाम फिर क्यों उदास है दोस्त’. रफींनी जगभरात आपल्या गायनाची अमिट छाप सोडली. आजही रफींच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. नवीन पिढीतील बहुतेक गीतकार त्यांना आपला आदर्श मानतात. रफी आपल्या गायकीने नेहमीच प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत राहतील.