देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज 27 जुलैला सातवी पुण्यतिथी आहे. ‘मिसाईल मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. कलाम यांचे 2015 मध्ये आयआयएम शिलाँग येथे भाषण करताना हृदयविकाराच्या झटक्याने आजच्या दिवशी निधन झाले. डॉ. कलाम आपल्यात नसतील, पण त्यांचे उदाहरण आजही दिले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की 2002 मध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. ते त्यांच्या साधेपणासाठीही प्रसिद्ध होते. चला, आज डॉ. कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनाशी निगडित अशाच काही गोष्टी जाणून घेऊया.
राष्ट्रपती असताना केवळ 2 वेळा घेतली होती रजा
डॉ. कलाम यांनी शास्त्रज्ञ असताना जी कीर्ती मिळवली, ती राष्ट्रपती असताना अधिक गाजली. त्यांनी राष्ट्रपती भवनाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले केले. आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात डॉ. कलाम यांनी केवळ 2 वेळा रजा घेतली. पहिली रजा त्यांनी वडील वारल्यावर घेतली आणि दुसरी रजा त्यांनी आईच्या मृत्यूच्या वेळी घेतली.
कर्मचाऱ्याच्या मुलांना स्वत: प्रदर्शन दाखवायला घेऊन गेले
हा किस्सा डॉ. कलाम यांचा साधेपणा दाखवतो. वास्तविक, त्या काळात डॉ. कलाम डीआरडीओमध्ये काम करत असतं. एकदा त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे लवकर घरी जाण्याची परवानगी मागितली. कारण मुलांना एका प्रदर्शनाला घेऊन जायचे होते, पण अत्यावश्यक कामामुळे तो वेळेवर घरी पोहोचू शकला नाही. याचे त्याला खूप वाईट वाटले. मात्र, रात्री साडेआठच्या सुमारास तो घरी पोहोचला असता मुले घरी नव्हती. पत्नीला विचारल्यावर कळले की ठीक 5 वाजता डॉ. कलाम स्वतः घरी आले आणि मुलांना प्रदर्शन दाखवायला घेऊन गेले.
कोणाकडूनही घेत नव्हते भेटवस्तू
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे अतिशय साधे व्यक्तिमत्व होते. ते कधीही कोणाकडूनही भेट घेत नव्हते. इतरांचा आनंद आणि आशीर्वाद ही त्यांना मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे, असे डॉ. कलाम म्हणायचे. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यावर कोणीतरी त्यांना 2 पेन भेट म्हणून दिल्या, पण अगदी उत्स्फूर्तपणे ते घेण्यास नकार देऊन त्यांनी परत केल्या.
विशेष खुर्चीवर बसण्यास दिला नकार
डॉ. एपीजे कलाम यांच्या साधेपणाचे आणखी एक उदाहरण. त्यांना आयआयटी बीएचयूच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. ते समारंभाला पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांना बसण्यासाठी एक मोठी आणि उंच खुर्ची ठेवण्यात आली होती, तर बाकीच्या पाहुण्यांना एक छोटी खुर्ची होती. हे सर्व पाहून कलाम यांनी त्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला होता आणि त्यांच्या बसण्यासाठी बाकीच्या पाहुण्यांसारखीच खुर्ची मागितली होती.