उद्याने दुरुस्ती करून खुली करा : अंबाजोगाईकरांची मागणी
अंबाजोगाई : शहरातील उद्यानांची नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अत्यंत दुरवस्था झाली असून ही उद्याने ‘भकास’ झाली आहेत. कधीकाळी अंबाजोगाई शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी ही उद्याने मोडकळीस येवून अखेरची घटका मोजत आहेत. या उद्यानांची दुरुस्ती करून अंबाजोगाईकरांसाठी खुली करण्यात यावी, अशी आता मागणी जोर धरू लागली आहे.
अंबाजोगाई शहरात नगरपरिषदेने लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी जवळपास तीन उद्याने उभारली आहेत. या तिन्ही उद्यानांची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्ती न केल्यामुळे दयनीय अवस्था झाली आहे. नगरपरिषद जवळ असणारे उद्यान तर ऐकेकाळी अंबाजोगाई शहराचे वैभव होते.
सायंकाळी या उद्यानात लहान मुलांची, पालकांची आणि वयोवृद्ध नागरिकांची तुफान गर्दी असायची. उद्यानातील खेळणी, त्या ठिकाणी हुबेहूब बनवलेल्या प्राण्यांच्या मुर्ती, कारंजे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. पण आता तशी परिस्थिती राहिली नसून उद्यानाची पुर्णपणे वाट लागल्यानं ही उद्याने ओस पडली आहेत. अशीच परिस्थिती शहरातील विमा कार्यालयाजवळ आणि योगेश्वरी मंदीराजवळ असणाऱ्या उद्यानांची झाली आहे. योगेश्वरी मंदीराजवळ असणाऱ्या उद्यानात तर आता गायी – म्हशी चरण्यासाठी सोडलेल्या असतात.
ही उद्याने दुरुस्त करण्यासाठी शहरातील नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली. परंतू, नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या निवेदनानां केराची टोपली दाखवली. आता पुन्हा शहरातील उद्याने चर्चेचा विषय ठरल्याने नगरपरिषद प्रशासनाने ही उद्याने तात्काळ दुरुस्त करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.