शेतकऱ्यांनो बांबू लागवड करून पर्यावरण संवर्धनासोबतच आर्थिक उन्नती साधा – पाशा पटेल

देवळा येथे पोकरातंर्गत पार पडली बांबू लागवड कार्यशाळा 

अंबाजोगाई : पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे वातावरणात कार्बनचे प्रमाण धोकादायक झाले आहे. यामुळे भावी पिढीला शुद्ध हवा तसेच यातून उत्पादन मिळविण्यासाठी बांबू लावगड करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पाशा पटेल यांनी केले.

बांबू लागवड तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन सोमवारी (दि.25) देवळा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते. 

या कार्यशाळेचे उद्‍घाटन अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी तथा तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, मंडळ कृषी अधिकारी आर. डी. बर्वे, तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर, कृषी पर्यवेक्षक सुरेश ढाकणे, पंडित काकडे, लक्ष्मीकांत आराध्ये, दगडू रांजनकर, मंडळ अधिकारी सीमा देशमुख, तालुक्यातील सर्व कृषि सहायक, आत्माचे सर्व कर्मचारी, तलाठी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी पटेल म्हणाले, की वृक्षतोडीमुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोचले आहे. आगामी काळात पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाईल, यासाठी ऑक्सिजन भरपूर उपलब्ध होऊन कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या बांबू लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे. बांबू लागवडीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बांबू हे एक महत्त्वाचे घटक आहे. बांबूची शेती, लागवड कशी करावी, बांबू प्रजातीचे जीवनचक्र 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही. बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेतीसारखे नुकसान होत नाही. बांबूच्या बेटामध्ये दरवर्षी 8 ते 10 नवीन बांबू तयार होत असतात. बांबूपासून अनेक वस्तू बनविण्यात येत आहेत. तसेच इथेनॉल, सीएनजी बनविण्यात येणार आहे. यामुळे बांबूला दरही मिळेल, असे ते म्हणाले. 

उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत बांबू लागवड घटकसाठी असलेल्या अनुदानाची माहिती देऊन बांधावर जर शंभर बांबूच्या झाडांची लागवड केली तर चौथ्या वर्षापासून दरवर्षी पन्नास हजार रुपये मिळू शकतात तसेच एक एकरवर बांबू झाडांच्या सलग लागवडीपासून दोन लाख रुपये एकरी मिळू शकतात, असे सांगितले.

अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी जिल्हाधिकारी परिसरात लागवड केलेल्या मियावाकी उपक्रमाची माहिती देऊन प्रतिकूल हवामानामध्ये अनुकूल शेती करण्याच्या दृष्टीने व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांबू लागवड करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. 

पोकरा प्रकल्पाचे मनुष्यबळ विशेषज्ञ जयशिव जगधने यांनी पोकरा डीबीटी ॲप्लीकेशनची माहिती देऊन बांबू लागवड अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत देवळावासीयांनी देवळा गावाच्या जवळून जाणाऱ्या मांजरा व होलणा नदी काठावर शेजारील सर्व तीन किलोमीटर लांबीच्या क्षेत्रात बांबू लागवड करण्याचे ठरवले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र देवरवाडे तर प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर आणि आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी आर. डी. बर्वे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामीण किसान शेतकरी गट, सारसा व देवळा श्रमकरी गट, देवळाचे सदस्य बाबासाहेब यशवंत, अशोकराव खामकर, दीपक देशमुख, योगेश निळकंठ, जयदेव देशमुख, फुलचंद देशमुख, संदीपान साळुंके, श्रीकृष्ण शितोळे, विनोद शेळके, प्रकाश देवरवाडे, श्रीकृष्ण पवार, गणेश जाधव, श्रीकृष्ण गवळी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.