मुंबई : विदर्भ तसंच मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण या मागणीचं पत्र लिहीलं असल्याचं, पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.
अजित पवार म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेता या नात्याने आमच्याकडनं पत्र दिलेलं आहे. विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा. सततच्या पावसामुळे पंचनामे अजूनपर्यंत होऊ शकले नाहीत. पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांना कुठलाही प्रकारचा दिलासा मिळत नाही. त्याच्यामुळे तातडीनं दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातनं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. त्याला तिथं मदत दिली गेली पाहिजे आणि नेहमीच्या एसडीआरएफ च्या नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे मदत करून चालणार नाही.
या पार्श्वभूमीवर तातडीनं विधीमंडळाचं अधिवेशन बोलवण्याची मागणीही अजित पवार यांनी केली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना विधानसभेत लोकप्रतिनिधींच्या चर्चेतून योग्य ती मदत तत्काळ करता येईल, असंही पवार यांनी म्हटलं आहे.