475 गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचा आधार
अंबाजोगाई : संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेतंर्गत आधार माणूसकीच्या उपक्रमातर्फे रविवारी (दि.24) येथे लोकसहभागातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मातांना साड्यांची मदत देण्यात आली. ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी सातत्य ठेवत आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे आवाहन प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डाॅ. विठ्ठल लहाने यांनी रविवारी येथे केले. निराशा सोडून आशावादी व्हा, आत्महत्या थांबतील अशा भावना निखिल पिंगळे यांनी व्यक्त केल्या.
येथील सौभाग्य मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी डॉ. पांडूरंग पवार हे होते. यावेळी डाॅ. निलेश नागरगोजे, प्रा. संदिपान मोरे, केएसबीएल बिल्डर्स ग्रुपचे अतुल संघानी, अनंत लोमटे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यशाचा पासवर्ड वापरा
उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशुन बोलताना डाॅ. विठ्ठल लहाने म्हणाले की, प्रत्येकाने जीवनातील यशाचा पासवर्ड ठरवून घेतला पाहिजे. त्यात कमिटमेंट, कन्सीसटन्सी, काॅन्फीडन्स व कनेक्शन या चार गोष्टीच्या एकत्रीकरणातून यशाचा मार्ग जातो.
निराशा सोडून आशावादी व्हा, आत्महत्या थांबतील : पिंगळे
निराशा सोडून आशावादी व्हा, आत्महत्या थांबतील, अशा भावना निखिल पिंगळे यांनी व्यक्त केल्या. मुलांना सांगताना ते म्हणाले, जीवनात स्पर्धा खुप मोठी आहे. स्पर्धा करा, परंतू त्याबद्दलची भावना चांगली ठेवा. दुसरी मुलं माझ्यापेक्षा पुढे गेली पाहिजेत, अशी भावना ठेवा. आधार माणुसकी हा उपक्रम तुमच्या पाठीशी देवासारखा उभा आहे. आपणही मोठे झाल्यावर मदतीची भावना ठेवा, असे आवाहन निखिल पिंगळे यांनी केले.
यावेळी डाॅ. पांडूरंग पवार व डाॅ. नवनाथ घुगे यांचीही भाषणे झाली. ॲड. संतोष पवार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या मदतीसाठी सर्व समाज एकवटला असून हे कुटुंबिय उघड्यावर पडणार नाही, याची काळजी समाज घेत आहे. या शेतकरी कुटुंबियांचे मनोबल वाढून ते सक्षमपणे व्हावेत, अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी, वंचित घटकातील कुटुंबियांचे आरोग्य हे निरोगी व सुदृढ राहावे, यासाठी खासगी डॉक्टरांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणीसाठी डाॅक्टरांनी पुढाकार घेऊन मानवतेचे दर्शन घडविले असल्याचे ॲड. पवार म्हणाले.
यावेळी उपस्थितांच्या हस्ते बीड व लातूर जिल्ह्यातील 275 कुटुंबातील 475 मुलांना शैक्षणिक साहित्य, मातांना साडी, चोळी व सोबत रोपटे भेट दिले. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन वैद्यकीयसाठी प्रवेश मिळविलेल्या गुणवंतांचा सत्कार झाला. या प्रसंगी उपस्थितही गहिवरून गेले होते, कारण हा सोहळाच भावस्पर्शी व वेगळ्या धाटणीचा होता.
उपस्थितांचे स्वागत अनंत निकते, राजेंद्र घोडके, भगवंत पाळवदे, ॲड. सुधाकर सोनवणे, परमेश्वर भिसे, सुलभा धनराज पवार, सुलक्षणा पवार, गोरख मुंडे, रमेश कदम यांनी केले. यावेळी कुटे ग्रुपतर्फे पाहुण्यांचे स्वागत झाले. सूत्रसंचालन रचना परदेशी यांनी केले. भक्ती गीत व स्वागत गीत सुभाष शेप, मयुरी मजगे यांनी सादर केले. प्रशांत बर्दापूरकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी प्रदीप जिरे, धनराज पवार, स्नेहा तांदळे, साक्षी पवार, संजय सुरवसे, विश्वास लवंद, अशोक परळकर, औदुंबर अंजान, रेखा घाटे, अरुण ताटे, किसकिंदा पांचाळ, सरीता सुरवसे, अनुराधा साठे, भिमा कांबळे, मायाताई, बालासाहेब घोरपडे, सुंदर गवळी, अर्जुन मस्के, राम ढोबळे, अशोक सुरवसे यांनी पुढाकार घेतला.