भारतातला गरीब स्वप्न पाहू शकतो अन् त्याला पूर्णही करु शकतो : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी घेतली शपथ

राष्ट्रपती मुर्मू यांना 21 तोफांची दिली सलामी

नवी दिल्ली : आपल्या सारख्या आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला, याचा अर्थ असा होतो की, भारतातला गरीब स्वप्न पाहू शकतो अन् त्याला पूर्णही करु शकतो, असं नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं.

सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रमण्णा यांनी त्यांना पदाची शपथ दिली. वॉर्ड काऊन्सिलर ते देशाच्या राष्ट्रपती होण्याची संधी आपल्याला मिळाली, ही भारताची महानता असून, लोकशाहीची ताकद असल्याचं त्या म्हणाल्या. 

पुढच्या 25 वर्षात देशाला ‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’ या दोन मार्गांवर वाटचाल करावी लागणार असून, या 25 वर्षांत अमृतकाळ प्राप्तीचा मार्ग पुढे जाईल, जे प्रत्येकाचे प्रयत्न आणि प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं, राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केलं आहे. 

26 जुलै हा कारगिल विजय दिवस असून, हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयम या दोन्हींचं प्रतीक असल्याचं सांगून राष्ट्रपती मुर्मू यांनी, देशाच्या सैन्याला आणि सर्व नागरिकांना कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी, उपेक्षितांच्या उत्थानासाठी, महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याच्या आपल्या संकल्पाचा राष्ट्रपतींनी पुनरुच्चार केला.

या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे राज्यपाल तसंच मुख्यमंत्री, संसद सदस्य आणि प्रमुख नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. तत्पूर्वी, राष्ट्रपती मुर्मू यांनी आज सकाळी राजघाट इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.