नवी दिल्ली : कारगील विजय दिवस आज साजरा होत आहे. 1999 मध्ये 60 दिवसांपेक्षा अधिक चाललेल्या कारगील युद्धात भारतीय सैन्यानं मिळवलेल्या विजयाचं स्मरण म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्मा जवानांचं स्मरण करत त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
हा दिवस आपल्या सैन्य दलांनी दाखवलेल्या अतुलनीय साहस आणि शौर्याचं प्रतीक आहे, देशातले नागरिक सशस्त्र दलांचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सदैव ऋणी राहतील, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं आहे.
दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी आणि नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांनी पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्मा जवानांना अभिवादन केलं.