अंबाजोगाई – केज रोडवरील दुकानात घडली घटना : गुन्हा दाखल
अंबाजोगाई : शहरातील अंबाजोगाई – केज रोडवर असलेल्या दुकानात जबरी चोरीची घटना घडली आली आहे. टायरच्या दुकानाचे शटर तोडून तब्बल 24 लाखांचे टायर्स अज्ञात चोरटे घेऊन फरार झाले आहेत. ही घटना दिनांक 22 जुलैला शुक्रवारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई – केज रोडवर आर्यवीर मंगल कार्यालयाच्या समोर प्रवीण बाळासाहेब करपे (रा. जवळबन, ता. केज) यांचे वाहनांच्या टायरचे दुकान आहे. गुरुवारी दिवसभर काम आटोपून करपे यांनी रात्री दुकान बंद केले आणि ते गावाकडे निघून गेले. त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तांबीच्या साह्याने तोडून गोडाऊनमधील विविध कंपनीचे तब्बल 24 लाखांचे टायर्स आणि ट्यूब घेऊन फरार झाले.
शुक्रवारी सकाळी प्रवीण करपे यांना दुकान फोडल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी प्रवीण करपे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सोनेराव बोडखे करत आहेत.