औरंगाबाद : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिला संकल्प शेतकऱ्यांबद्दल केला होता, तो म्हणजे राज्यात एकही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होत.
मात्र, मुख्यमंत्र्यांच्या संकल्पानंतर राज्यात शेतकऱ्यांच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 1 जुलै पासून राज्यात तब्बल 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले आयुष्य संपविले आहे. या शेतकऱ्यांमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा संकल्प हवेतच विरला असल्याचं चित्र समोर आले आहे.
23 दिवसांत मराठवाड्यातील 46 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
हाती आलेल्या आकड्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन आज 23 दिवस पूर्ण होत आहेत. या 23 दिवसात तब्बल राज्यातील 89 शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपविले आहे. यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. गेल्या 23 दिवसांत मराठवाड्यातील तब्बल 46 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यतील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या ?
औरंगाबाद -15, बीड – 13, उस्मानाबाद – 05, परभणी – 06, नांदेड – 02 ,जालना – 05, यवतमाळ – 12, अहमदनगर – 07, जळगाव – 06, बुलडाणा – 05, अमरावती – 04, वाशीम – 04, अकोला – 03, भंडारा – चंद्रपूर – 02 अशी संख्या आहे.