रिक्षाच्या हॉर्नमधून वाघाची डरकाळी येणार : ‘टाइमपास 3’ मधील धम्माल गाणं 

मुंबई : ‘टाइमपास 3’ च्या ट्रेलरमधून एका गाण्याच्या केवळ एकाच ओळीने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली होती. ती ओळ होती ‘याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली वाघाची डरकाळी’ ! ही एवढी एकच ओळ ऐकून हे गाणं धमाल असणार आहे, हे रसिकांनी ओळखलं होतं. त्यामुळेच ते या गाण्याची उत्सुकतेने वाट बघत होते. हे पूर्ण गाणं त्यांच्या भेटीला आलं आहे.  

वैशाली सामंत च्या ठसकेबाज आवाजाचा तडका लागलेलं आणि कृतिका गायकवाडच्या दिलखेचक अदांनी सजलेलं हे गाणं धमाका उडवून देण्यास सज्ज झालं आहे. 

‘टाइमपास’ च्या यापूर्वीच्या दोन्ही भागातील गाणी विशेष लोकप्रिय झाली होती. क्षीतिज पटवर्धनचे शब्द असलेल्या या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे अमितराजने तर आवाज आहे वैशाली सामंतचा. या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी तर या गाण्यावर ठेका धरत दिलखेचक अदा पेश केल्या आहेत कृतिका गायकवाडने. 

झी स्टुडिओज् आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव यांचं आहे तर प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे ही जोडी मुख्य भूमिकेत आहे.