वाघेबाभूळगाव प्रकल्प : कालवा दुरुस्तीच्या निधीवरून भाजप – राष्ट्रवादी आमने – सामने

आजी – माजी आमदार समर्थकात श्रेयवादाची लढाई 

अंबाजोगाई : केज मतदार संघातील वाघेबाभूळगाव प्रकल्पाच्या कालवा दुरुस्तीच्या निधीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. प्रकल्पाच्या कालवा दुरुस्तीसाठी पाठपुरावा कोणी केला ? निधी कोणामुळे मंजूर झाला यावरुन भाजप – राष्ट्रवादी आमने – सामने आले असून आजी – माजी आमदार समर्थकांत निधीवरून श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

केज तालुक्यातील वाघेबाभूळगाव मध्यम प्रकल्पाच्या कालव्यातून प्रवाहित होणारे पाणी आजूबाजूच्या शेतात घूसून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होण्याच्या घटना अतिवृष्टीच्या काळात वारंवार घडत आहेत. यासाठी केज मतदार संघाच्या विद्यमान आमदारांनी पाठपुरावा केल्याने कालव्याच्या दुरुस्तीसाठी 2 कोटी 21 लाख 80 हजार 916 रुपायांची शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे, अशा आशयाचे प्रसिध्दीपत्रक काढत आमदार समर्थकांनी वर्तमानपत्रांना, डिजिटल मिडियाला बातम्या दिल्या आणि त्या छापूनही आल्या. 

सदरिल बातम्या छापून आल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार ‌पृथ्वीराज साठे यांच्या समर्थकांत नाराजी पसरली. त्यांनीही आज समाजमाध्यमांत पोस्ट करत वाघेबाभूळगाव प्रकल्पाच्या कालवा दुरुस्तीसाठी माजी आमदार ‌पृथ्वीराज साठे यांनीच प्रयत्न केले, लोकप्रतिनिधींनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये, अशा आशयाची पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये म्हणटलं आहे की, मौजे वाघेबाभुळगाव ता. केज येथील मध्यम प्रकल्प कालव्याच्या विशेष दुरुस्तीच्या प्रस्तावास काल राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. तो शासन निर्णय पाहुन केज मतदार संघाचे लोकप्रतिनिधी वर्तमानपत्रात बातम्या छापून त्याचे श्रेय घेऊ पहात आहेत. परंतू, या कामांबाबत माजी आ. पृथ्वीराज साठे यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे.

तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना या प्रश्नाबाबत सतत भेटून पाठपुरावा केलेला आहे. तेव्हा ही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परंतू, सध्याचे लोकप्रतिनिधी याचे श्रेय घेऊ पहात आहेत. तरी ह्या कामांबाबत सर्व पाठपुरावा माजी आ. पृथ्वीराज साठे यांनी केलेला आहे, त्याचे सर्व श्रेय माजी आमदार साठे यांचेच आहे. त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न लोकप्रतिनिधीने करु नये, असं त्या पोस्टमध्ये म्हणटलं आहे. सोबत माजी आमदार समर्थकांनी ‌पाठपुरावा केलेल्या बातम्या, फोटो शेअर केले आहेत. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली. त्यामुळे केज मतदार संघातील भाजप समर्थकांत आनंदाचं वातावरण आहे. गेली अडीच वर्षे जिल्हृयात आणि मतदार संघात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याने म्हणावं तितक्या प्रश्र्नांना भाजप समर्थक न्याय देऊ शकले नाहीत, आता सत्ता बदलल्याने त्यांनाही ‘अच्छे  दिन’ आले‌ आहेत. वाघेबाभूळगाव प्रकल्पाच्या कालवा दुरुस्तीच्या निधीवरून भाजप – राष्ट्रवादी समर्थकांत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे, हे मात्र निश्चित आहे.