टीम AM : गोरा रंग, साधे रूप, तेज – टोकदार नाक, गालावरील तीळ आणि आपला दमदार अभिनय या विशेष गुणांमुळे सिनेसृष्टीत रंजना देशमुख सर्वांना परिचित होत्या. त्यांचा आज जन्मदिन आहे. रंंजना देशमुख यांचा जन्म 23 जुलै 1955 रोजी झाला. लोक त्यांना रंजना या नावाने जास्त ओळखतात. त्यांच्या विशिष्ट अभिनय शैलीमुळे अल्पावधीतच त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आणि आजही त्यांना लोक विसरू शकले नाहीत.
मराठी चित्रपट जगताविषयी चर्चा करायची म्हटली तर रंजना देशमुख यांचे नाव घ्यावेच लागते. 1970 च्या दशकात रंजना यांनी आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. मुळात मुंबईकर असल्याने त्यांना ही दुनिया नवीन नव्हती. त्यांनी या क्षेत्रात मोठं नाव कमावलं आणि ते जपलं देखील.
रंजना यांचं पूर्ण नाव रंजना गोवर्धन देशमुख आहे. त्यांची आई वात्सल्या यादेखील अभिनेत्री होत्या. पूर्वीपासूनच सिनेक्षेत्रात काम करायची इच्छा असल्याने त्यांनी मिळालेल्या संधींचा योग्य उपयोग केला. 1975 मध्ये किरण शांताराम दिग्दर्शित ‘चंदनाची चोळी आणि अंग अंग जाळी’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटनगरीत पाऊल ठेवले.
1975 च्या काळात त्यांच्या ‘झुंज’ चित्रपटाने खूप यश संपादन केले. या चित्रपटाने रंजना – रवींद्र महाजनी ही नवीन हिट जोडी दिली. दुनिया करी सलाम, हिच खरी दौलत, देवघर, लक्ष्मीची पावले, कशाला उद्याची बात आणि मुंबईचा फौजदार यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.
‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘बिन कामाचा नवरा’, ‘खिचडी’, ‘जख्मी वाघीण’, ‘भुजंग’ आणि ‘एक डाव भुताचा’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत.
रंजना यांना विविध प्रकारची पात्र करायला आवडायची. त्यांनी कधी लहान किंवा अडाणी मुलीची तर कधी उच्च शिक्षित स्त्रीची भूमिका केली आणि या भूमिकांना 100 टक्के न्याय देण्याचा प्रयत्न केला. इ.स. 1980 आणि 1983 सालचा ‘उत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला.
पण नियतीच्या मनात वेगळेच होते. लोकप्रियतेचे शिखर गाठत असताना ‘झुंजार’ च्या शूटिंगला बॅन्गलोरला जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यामुळे त्यांना अकाली अपंगत्व आले. 13 वर्षे व्हीलचेअरवर व्यतित केल्यानंतर त्यांचे 3 मार्च 2000 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईमध्ये निधन झाले. त्यांना विनम्र अभिवादन.