राम कुलकर्णी यांची भाजपाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

राम कुलकर्णी यांच्या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत

अंबाजोगाई : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे विश्‍वासू सहकारी राम कुलकर्णी यांची भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी शुक्रवार, दि.20 सप्टेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे. राम कुलकर्णी हे स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे विश्‍वासू सहकारी म्हणुन ओळखले जातात. सलग 30 वर्षे मुंडे साहेबांच्या नेतृत्वाला लेखणीच्या माध्यमातून बळ देण्याचे काम त्यांनी केले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना 10 वर्षे त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्य केले. पुढे 1989 पासुन त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात पत्रकार म्हणुन कार्य करण्यास प्रारंभ केला. दै. देवगिरी तरूण भारत, दै. लोकपत्र, दै. लोकमत, दै. सकाळ आदी वर्तमानपत्रांत पत्रकारिता केल्यानंतर गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ राम कुलकर्णी हे दै. झुंजार नेता वर्तमानपत्रांत कार्य करीत आहेत. भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हा प्रसिद्धप्रमुख ते मराठवाडा सहप्रवक्ते म्हणुन कुलकर्णी यांनी केलेले कार्य उल्लेखनिय ठरले आहे.

स्व.मुंडे साहेबानंतर ना.पंकजाताई व खा. डॉ.प्रितमताई यांच्यासाठी खंबीरपणे व निष्ठेने राम कुलकर्णी यांनी केलेले कार्य पाहुन तसेच भाजपाच्या वतीने मराठवाड्यात पं.दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान यशस्विपणे राबविल्याबद्दल ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कलम 370, 35 (अ) याचे जनजागरण व संपर्क अभियान सध्या मराठवाड्यात राबविण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्याच्या नेत्या ना. पंकजाताई मुंडे यांचे विश्‍वासू सहकारी म्हणुनही कुलकर्णी यांची सर्वदुर ओळख आहे. त्यांच्या एकनिष्ठेचे फळ अखेर त्यांना भाजपाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती मिळाल्याने प्राप्त झाले आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सुचनेवरून आणि ना.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून कुलकर्णी यांना प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र कार्यालय सचिव मुकुंदराव कुलकर्णी यांनी शुक्रवार,दि. 20 सप्टेंबर रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तापदी नियुक्ती केल्याचे पत्र दिले असून सदरपत्र त्यांना भाजपा प्रवक्ते माधवराव भंडारी व केशवराव उपाध्ये यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर राम कुलकर्णी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे, माधवराव भंडारी, केशवराव उपाध्ये, मुकुंदराव कुलकर्णी यांचे आभार मानले असून भारतीय जनता पक्षाचा विचार व सरकारच्या वतीने करण्यात आलेली विकास कामे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोंचवून भाजपाचा जनाधार वाढवू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

राम कुलकर्णी यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे बीड जिल्ह्यातील आमदार प्रा. संगिताताई ठोंबरे, आमदार आर.टी. देशमुख, आमदार सुरेशराव धस, आमदार भिमराव धोंडे, आमदार लक्ष्मणराव पवार, केशवराव आंधळे, जिल्हाध्यक्ष रमेशराव पोकळे, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले असून प्रवक्तेपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर राम कुलकर्णी यांनी थेट मुंबईहुन गोपीनाथगड येथे जावून दिवंगत लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.