विशेष लेखपरिक्षकांनी स्वतः साखर आयुक्तांना याबद्दलचे पत्र पाठवून प्रमाणपत्र मागितले आहे – व्यंकटेश्वराकडून ते पत्र जारी
अंबाजोगाई : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अंबासाखर सहकारी साखर कारखाना 2021 च्या गळीत हंगामापासून भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतलेला असून, सन 2021- 22 या हंगामात गाळप केलेल्या पूर्ण 2 लाख 11 हजार 763 मेट्रिक टन ऊसाचे संपूर्ण देयक एफआरपी प्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेले आहे. कारखान्याकडे या गळीत हंगामातील एफआरपीचा एक रुपयाही थकीत नसून याबद्दल समाज माध्यमात पसरलेले वृत्त पूर्णपणे चुकीचे व निराधार असल्याचे व्यंकटेश्वरा (अंबासाखर) चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जंगम यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
शासनाने ठरवून दिलेली एफआरपी रक्कम 1997.69 रुपये प्रतिटन इतकी असून व्यंकटेश्वराने प्रतिटन 2000 रुपये प्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वितरीत केलेली आहे.
प्रत्येक पंधरवाड्याचे प्रतिटन 2000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना वितरित केलेल्या रक्कमेचे अहवाल व्यंकटेश्वराने यापूर्वीच सादर केले असून, कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 42 कोटी 19 लाख 60 हजार रुपये रक्कम वर्ग केलेली आहे. याबाबत साखर विभागाचे विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था, बीड यांनी कारखान्याने पूर्ण देयके अदा केल्याचा अहवाल साखर आयुक्तांना दि. 07 जुलै रोजीच पाठवलेला आहे व त्याबाबतचे प्रमाणपत्र मागितले आहे.
विशेष लेखा परीक्षकांच्या अहवालाची प्रत व्यंकटेश्वरा (अंबासाखर) प्रशासनाकडून जारी करण्यात आली असून, संस्थकडे एफआरपी थकीत असल्याचे प्रसिद्ध करण्यात आलेले वृत्त चुकीचे व संस्थेची बदनामी करणारे आहे, असे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करत असताना संबंधित संस्थेच्या प्रमुखांना याबाबत खुलासा विचारून प्रसिद्ध करावे, ज्यामुळे संस्थेची बदनामी होणारे नाही, तसेच सभासद, शेतकरी, ग्राहक आदींमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन श्री. जंगम यांनी केले आहे.
सन 2021 – 22 या हंगामात बीड जिल्ह्यात मोठे ऊस संकट उभे राहिले होते, हजारो हेक्टरवरील ऊसाचा गाळपचा प्रश्न उभा राहिला होता. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीजने अंबासाखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेऊन काही दिवसातच 2 लाख 11 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले होते, तसेच संबंधित शेतकऱ्यांना वेळच्या वेळी एफआरपी प्रमाणे ऊसाचे बिल अदा केले होते; त्यामुळे परळी, अंबाजोगाई, केज आदी तालुक्यांसह या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता.