यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्यार्थी – प्राध्यापकांसाठी वित्तीय साक्षरता शिबीर 

अंबाजोगाई : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व आयडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागाच्या वतीने वित्तीय साक्षरता शिबिर पार पडले. या शिबिराचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयडीएफसी बँकेचे शाखाप्रमुख गणेश सौदागर यांची उपस्थिती होती. 

याप्रसंगी सौदागर यांनी प्राध्यापक व विद्यार्थी यांना आर्थिक साक्षरते संदर्भात मार्गदर्शन केले. वित्तीय बचत ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. या बचतीचे विविध मार्ग त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच बँकेच्या माध्यमातून वित्तीय उपलब्धता व वित्तीय उभारणी कशी निर्माण होते, यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.

शिबिराचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी आजघडीला डिजिटल व्यवहारामध्ये खूप वाढ झाली आहे. हा व्यवहार करताना दक्षता बाळगावी लागते, तसेच या माध्यमातून होणारा व्यवहार खूप सहज आणि गतीने होतो. त्यामुळे या सर्व व्यवहाराबाबत आर्थिक साक्षर असणे खूप गरजेचे आहे, असे विचार व्यक्त केले.

याप्रसंगी विचारमंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे, उपप्राचार्य प्रा. पी. के जाधव, उपप्राचार्य प्रा. हनुमंत कलबुर्गी, सहाय्यक शाखाप्रमुख नजमुद्दीन सय्यद व कुणाल राजपूत यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीवन शिक्षण विस्तार सेवा विभागाच्या समन्वयक डॉ. अहिल्या बरूरे यांनी केले. शिबिराचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. धनंजय खेबडे यांनी मानले. या शिबिरास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.