शिंदें सरकारचा पवारांना दणका : ‘नगरविकास’ च्या कामांना स्थगिती

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकार महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देत आहे. जिल्हा विकास प्रकल्पांतर्गत देण्यात येणारा निधी रोखल्यानंतर आता शिंदे सरकारनं विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांना पुन्हा एक दणका देत ‘नगरविकास’ च्या कामांना स्थगिती दिली आहे.

शिंदे सरकारनं 941 कोटींच्या ‘नगरविकास’ विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे. यापैकी एकट्या बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण झाले होते. ही कामे मार्च 2022 ते जून 2022 या कालावधीत मंजूर करण्यात आली होती.

विशेष बाब म्हणजे शिंदे सरकारने फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती दिली आहे. तर शिवसेना आमदारांनी सूचवलेल्या कामांना मात्र अभय देण्यात आला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी दिला जात नसल्याची शिवसेना आमदारांची तक्रार होती. त्यामुळे सत्ता बदल झाल्यानंतर कामांना स्थगिती देण्यात आल्याची चर्चा आहे.