औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब ‌: मुख्यमंत्र्यांची घोषणा

एमएमआरडीएला 60 हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता

मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. तो निर्णय शिंदे सरकारने रद्द केला होता. आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा औरंगाबादचं नाव संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय झाला आहे.

त्याचबरोबर नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय झाला आहे. एमएमआरडीएला 60 हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. तसंच पहिल्या टप्प्यात 12 हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं.