लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : 20 वर्षांत रस्त्यावर छदामही खर्च नाही
अंबाजोगाई : विद्यार्थ्यांच्या खांद्यावर देशाचं भविष्य अवलंबून आहे, असं सगळेजणं म्हणतात. परंतू ज्यांच्या खांद्यावर देशाचं भवितव्य आहे, त्याच विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार अंबाजोगाई तालुक्यातील एका रस्त्यामुळे होत आहे.
सोनवळा – भावठाणा या 7 किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागत आहे. गेल्या 20 वर्षांत या रस्त्यावर छदामही खर्च झाला नाही. विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थांना देखील या रस्त्यावरून जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा – भावठाणा हा रस्ता गेल्या 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित आहे. दरवर्षी पावसाळ्यात तर रस्त्यावर पाणी आणि चिखल मोठ्या प्रमाणात साचला जातो. या चिखलातूनच वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं. गेल्या कित्येक वर्षांपासून परिस्थिती ‘जैसे थे’ चं आहे.
रस्त्याच्या समस्येला कंटाळून ग्रामस्थांनी आमदार, खासदारांना निवेदनही दिली. परंतू, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दरवेळेस लोकप्रतिनिधींनी आश्वासनं देत वेळ मारुन नेली. अजूनही या भागातील विद्यार्थी, ग्रामस्थ लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे आशा ठेवत रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
लोकप्रतिनिधींना माया, दया आली नाही
सोनवळा – भावठाणा रस्त्यांसाठी अनेकवेळा संघर्ष केला. लोकप्रतिनिधी, पुढाऱ्यांचे उंबरठे झिजविले. मात्र, एकाही लोकप्रतिनिधी, पुढाऱ्याला या भागातील विद्यार्थ्यांविषयी माया, दया आली नाही. मुळात ग्रामीण भागातील मुलं शिकून चांगली संस्कारक्षम आणि प्रभावी झाली पाहिजे, यासाठी सरकारचा पुढाकार दिसून येतो. मात्र, स्थानिक पुढारी व नेते स्व:ताच्या बडेजावपणासाठी अशा प्रश्नांना बगल देतात, असे सोनवळा येथील युवानेते ओमकार पतंगे यांनी सांगितले.