मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस सिनेमापेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य तर महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यात फिट्ट झालं असेल.
महाराष्ट्राच्या याच राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर एक नवी कोरी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘रानबाजार’ नंतर प्लॅनेट मराठी ओटीटीवर महाराष्ट्राच्या सत्तानाट्यावर आधारित ‘मी पुन्हा येईन’ नावाची वेबसीरिज रिलीज होणार आहे.
‘मी पुन्हा येईन’ चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता भारत गणेशपुरे सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसत आहे. भारत गणेशपुरेला ‘मी पुन्हा येईन’, असं म्हणताना पाहून चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. सीरिजचा टीझर प्रदर्शित होताच वेबसीरिजची चांगलीच चर्चा रंगली आहे.
या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
‘मी पुन्हा येईन’ चं खास वैशिष्ट्य म्हणजे सीरिजचं लिखाण आणि दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केलं आहे. अनेक वर्ष ते सिनेक्षेत्रात आपल्या लिखाणाची छाप पाडत आले आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ मधील त्यांचे पोस्टमनची पत्रे प्रेक्षकांना विशेष आवडली होती. वेब विश्वातल्या त्यांच्या या कलाकृतीने अरविंद जगताप एका नव्या रुपात आपली लेखणी प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत. या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे.