नगरपरिषद – नगरपंचायत : पावसाची परिस्थिती बघता निवडणूका पुढे ढकला – भाजप

मुंबई ‌: राज्यातली सध्याची पावसाची परिस्थिती बघता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेतल्या जाणाऱ्या 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी, भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं, राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वाखालील एका शिष्टमंडळानं, काल मुंबईत निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन ही मागणी केली.

सर्वत्र निर्माण होत असलेली पूर परिस्थिती बघता सर्वच राजकीय पक्षांना प्रचारामध्ये अडचणी येऊ शकतात, तसंच मुसळधार पावसामुळे आणि नदीनाल्यांना येत असलेल्या पुरामुळे ग्रामीण जनतेला मतदानासाठी बाहेर पडणं शक्य होणार नसल्यानं, या निवडणुकांबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला असल्याचंही, भाजपानं या निवेदनात म्हटलं आहे.

त्यामुळे पावसाळ्यात निवडणुका घेणं संयुक्त नसल्याची भूमिका या शिष्टमंडळानं मांडली आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार या निवडणुका आज 12 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.