अंबाजोगाई : शहराच्या दक्षिणेला पोखरी मार्ग परिसरात अनेक नवीन वसाहती उभारल्या आहेत. सततच्या पावसामुळे या परिसरात जागोजागी पाणी साचले आहे. नाल्या, रस्त्याच्या अभावी घराभोवती पाणी साचले. काही जणांच्या तर घरात पाणी शिरले असून नागरिकांत इमारत पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
पोखरी मार्गावर अनेक शाळा व कॉलन्या उभारण्यात आल्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. हा परिसर जोगाईवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. ग्रामपंचायतीने निधीअभावी नागरिसुविधा केल्या नाहीत. सोमवारी सरपंचांनी नागरिकांना भेट देऊन उपाययोजना करण्याचे अश्वासन दिले. शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीने याकडे दुर्लक्ष केले आहे.
अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे इमारतींना धोका निर्माण झाला आहे. या भागात सिल्हवर सिटी, पिताजी सारडा नगरी, माऊली नगर, त्रिवेणी नगर, शिवपार्वती नगर, राधानगरी अशा अत्याधुनिक इमारतीच्या मोठ्या कॉलन्या उभारण्यात आल्या आहेत. परंतू, नाल्या आणि रस्त्याअभावी नागरिकांची कुचंबना होत आहे.
या परिरातील नागरिकांनी अनेकवेळा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, लोकप्रतिनिधींना नागरी सुविधा करण्यासाठी निवेदने दिले. परंतू त्याचा उपयोग झालेला दिसत नाही. आता नवीन मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.