केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
नवे सरकार अडीज वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल. त्यानंतरची 5 वर्षेही भाजप महायुतीच्या सरकारलाच मिळतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत ना. रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रिपाइंचे युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, एम. एस. नंदा आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या भाजप – शिवसेना महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा द्यावा, या मागणीबाबत ना. रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी रिपब्लिकन पक्षाला नक्की सत्तेत वाटा देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. रामदास आठवले यांना दिले.
राज्य सरकार आता छोटे मंत्रिमंडळ करीत असून त्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला नक्की मंत्रिपद देण्यात येईल. तसेच महामंडळ आणि राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाला वाटा देण्यात येईल, असेही आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी माध्यमांना दिली आहे.