डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रासाठी अंबाजोगाईतील 25 एकर जमीन हस्तांतरित

अंबाजोगाई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रासाठी शहरातील 25 एकर जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आली असून त्या जमिनीचा ताबाही मिळाला आहे, अशी माहिती व्यवस्थापन परीषद सदस्य तथा सिनेट सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने अंबाजोगाई येथे कौशल्य विकास केंद्र उभा करण्यास मंजुरी दिली होती. या केंद्रासाठी 25 एकर शासकीय जमीनीची आवश्यकता होती. त्या करिता विद्यापीठाने जिल्हा प्रशासनाकडे आवश्यक जमीनीची मागणी केली होती. 

जिल्हाधिकारी, बीड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दि. 17/06/2022 च्या आदेश क्र. 2014 महसुल – 1 क.भा.ज.प्र.क्र. 149 नुसार दि. 05/07/2022 रोजी मौजे अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड येथील शासकीय जमीन स. न. 17/अ/5 वाडी विभाजनानंतर मौजे काळवटी तांडा नवीन सर्वे नं. 1/अ/5 मधील शासकीय जमीनीचे क्षेत्र 10 हेक्टर 00आर (25 एकर) जमीनीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्याकडे कौशल्य विकास केंद्रासाठी ताबा दिला आहे.

अंबाजोगाई परिसराच्या शैक्षणिक विकासासाठी ही एक महत्वाची घटना आहे. या केंद्राचा बीड  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

पुढील काळात हे कौशल्य विकास केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे आणि त्या माध्यमातून या परिसरातील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारीत व व्यवसायाभिमुख दर्जेदार शिक्षण मिळावे, या करिता मी प्रयत्न करेन, असे‌ डॉ. नरेंद्र काळे यांनी म्हटले आहे.