अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, धारूर, गेवराईसह राज्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्टला मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. दरम्यान, आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. 29 जुलै रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करून वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
4 ऑगस्टपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. 5 ऑगस्टला चिन्हं वाटप होतील तर 18 ऑगस्टला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या कालावधीत मतदान होऊन 19 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल.