माणसातला माणूस वाचायला येणारा तोच खरा गुणवंत – प्रा. सतिष साळुंके

अंबाजोगाई : माणसातला माणूस वाचता येणाराच खरा गुणवंत असतो. तसेच कागदावरील गुण महत्त्वाचे ठरत नसून विद्यार्थ्यांचे अंगीभूत गुण हे महत्त्वाचे असतात, असे मत सुप्रसिद्ध लेखक, इतिहास तज्ञ, साहित्यिक प्रा. सतिष साळुंके यांनी व्यक्त केले. ते अंबाजोगाई पिपल्स को – ऑप बँकेच्या वतीने शहरातील 10 वी आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. नानासाहेब गाठाळ, ज्ञानप्रबोधिनीचे अभिजित जोंधळे, प्राचार्य बी. आय. खडकभावी, बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, मनोज लखेरा, सचिन बेंबडे, सुनील वाघाळकर आदींची उपस्थिती होती.

अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने शहरातील गुणवंत, यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, अंबाजोगाई शहर हे विद्येचे व संस्कृतीचे माहेरघर आहे. शहरातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन जे यश संपादन केले आहे, त्याबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित केला असल्याचे मोदी यांनी सांगितले. बँकेच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून असे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याला अपवाद केवळ कोरोना काळाचे दोन वर्षे ठरली, याबाबत खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

प्रा. सतिष साळुंके म्हणाले की, कुठलाही समोर बसणारा विद्यार्थी हा गुणवंतच असेल असे नाही. वर्गात सर्वात पाठीमागे बसणारा विद्यार्थी हा समोर बसणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा गुणवंत ठरू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना सभोवतालच्या समाजातील माणसातला माणूस कळला, तोचखरा गुणवंत ठरतो, असे मत साळुंके यांनी व्यक्त केले. आजचे गुणवंत हे उद्या समाजासाठी किती फायदेशीर ठरू शकतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे प्रा. सतिष साळुंके यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना एखाद्या गोष्टीची माहिती व त्याबाबतचे ज्ञान यातील फरक समजून घ्यायला हवा, यासाठी त्यांच्या बुद्धीची कसोटी लागणार असल्याचे प्रा. साळुंके यांनी सांगितले.

पुढे बोलताना साळुंके म्हणाले की, आपण कोणत्या समाजाचे आहोत हे महत्त्वाचे नसून तिथे आलेल्या परिस्थिती व संकटांना कसे सामोरे जाऊ, हे महत्वाचे असते. तसेच जोपर्यंत माणूस माणसाला जुडणार नाही, तोपर्यंत देश जुडणार नाही‌. विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात संघर्ष, संकट आणि स्पर्धांचा सामना करावा लागणार आहे. नशीब हे आभाळात किंवा आपल्या कपाळावर लिहिलेले नसून ते आपल्या मनगटातील इच्छाशक्तीवर निर्माण होते. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजकिशोर मोदी हे होय, असे गौरवोद्गार देखील प्रा. साळुंके यांनी काढले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा. नानासाहेब गाठाळ यांनी केला. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये काही दिवसांपासून मुलांपेक्षा मुलींची संख्या लक्षणीय ठरत असल्याने पालकांनी मुलांप्रमाणेच मुलींकडे जास्त लक्ष केंद्रित करून त्यांना त्यांच्या भविष्यासाठी नवीन वाटा निर्माण करून देण्याचे आवाहन प्रा. नानासाहेब गाठाळ यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद टाकळकर यांनी केले तर आभार विनायक मुंजे यांनी मानले. गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.