अंबाजोगाई : शहरातील नागझरी परिसरात एक दुःखद घटना घडली आहे. घराच्या बांधकामाला पाणी देताना शॉक लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव रोहित रामकृष्ण कळेकर असं आहे. ही घटना काल दिनांक 4 जुलैला घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, परळी येथे भुमि अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले रामकृष्ण कळेकर यांच्या घराचे बांधकाम नागझरी परिसरात सुरू आहे. काल दिनांक 4 जुलैला त्यांचा मुलगा रोहित हा घराच्या बांधकामाला पाणी देण्यासाठी गेला असता त्याला विजेचा शॉक लागला, यातच त्याचा मृत्यू झाला.
रोहित आताचं दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. रामकृष्ण कळेकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रोहित त्यांचा एकुलता एक मुलगा होता. कळेकर यांच्या मुळगावी जवळबन, ता. केज येथे रोहितच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.