उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते निवेदन
अंबाजोगाई : अंबाजोगाई – परळी रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्यात यावीत, अशी मागणी श्रमिक महासंघाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली होती. श्रमिक महासंघाने गांधीगिरी करत रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांत झाड देखील लावलं होतं.
श्रमिक महासंघाच्या आंदोलनाला आणि मागणीला यश आले असून निवेदनाची प्रशासनाने तातडीने दखल घेत आज दिनांक 2 जुलैपासून रस्ता दुरुस्तीच काम सुरू केले आहे.
श्रमिक महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक 30 जूनला उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात म्हटले होते की, शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते संत भगवानबाबा चौक या मुख्य रस्त्याची पडलेल्या खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे.
या रस्त्यावरून शाळा – महाविद्यालयात जाणारी शेकडो विद्यार्थी तसेच नागरिक प्रवास करित असतात. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रस्त्यांमुळे सामान्य नागरिकांचा बळी जाण्याअगोदर प्रशासनाने यात लक्ष घालून रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश तात्काळ द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
या निवेदनावर श्रमिक महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मण वाघमारे, आतिष बडे, उत्तरेश्वर जोगदंड, गणेश गडदे, मुकेश लोंढे, चंद्रकांत घोडके, महेश जोगदंड, सुधाकर देशमुख, मयुर शिंदे, जयपाल जोगदंड, प्रेम चव्हाण यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.