डॉ. नितीन चाटे यांच्या कार्याची दखल : ‘डॉक्टर्स डे’ निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. नितीन चाटे यांनी आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य जीवनदायी योजनेतंर्गत केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने घेतली असून ‘डॉक्टर्स डे’ निमित्त त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला आहे.

डॉ. नितीन चाटे हे गेली अनेक वर्षांपासून येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात सर्जरी विभाग प्रमुख म्हणून कार्य करित आहेत. याच सोबत ते वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेचे प्रमुख म्हणून काम पहात आहेत. 

या योजनेचा सर्वसामान्य रुग्णांना अधिक लाभ मिळवून देण्यासाठी डॉ. नितीन चाटे हे गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहेत. याचाच भाग म्हणून सदरिल महाविद्यालयाचा हा विभाग गेली चार वर्षे सतत मराठवाडा पातळीवरील प्रथम क्रमांकावर येत आहे. महाविद्यालयाच्या सर्जरी विभागाने सदरिल योजनेतंर्गत एप्रिल 2020 ते जून 2022 या कोरोना महामारीच्या काळात 3000 हुन अधिक शस्त्रक्रिया केल्याबद्दल राज्य शासनाच्या नॅशनल हेल्थ अ‍ॅॅॅॅॅॅॅॅथोरटी विभागाच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. चाटे यांना गौरविण्यात आले आहे. 

सदरिल गौरवाबद्दल डॉ. नितीन चाटे यांचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, आ. नमिता मुंदडा, विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे. राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात आलेल्या या प्रमाणपत्रावर नॅशनल हेल्थ अ‍ॅॅथोरटी विभागाचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफीसर सुधाकर शिंदे यांची स्वाक्षरी आहे.