औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांच्या नामांतराबाबत नव्याने ठराव करावा लागणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका

मुंबई : मराठवाड्यातील औरंगाबाद तसंच उस्मानाबाद शहरांच्या नामांतराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत नव्याने ठराव करावा लागणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत बोलत होते.

बहुमत चाचणीची सूचना असताना मंत्रिमंडळाची बैठक घेऊन असा ठराव करणं चुकीचं आहे, त्यामुळे हा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा मंजूर करावा लागणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, नामांतराचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारा असून, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराविरोधी कृती समितीचे अध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी घेतली आहे. काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषद घेत नामांतराच्या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शवला.