माझा राग मुंबईवर काढू नका
मुंबई : शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. या गटाला भाजपने पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. मात्र, शिवसेनेला बाजुला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री होणार नाही, अशी ठाम भूमिका राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. यावेळी त्यांनी शिंदेसेनेला शिवसेनेचा दर्जा देण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला.
एकनाथ शिंदे यांनी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली पत्रकार परिषद शिवसेना भवनात दुपारी घेतली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी मी हेच सांगितलं होतं, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करा. अडीच – अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेऊ. मात्र, त्यावेळी तुम्ही नकार का दिला. आणि आताच का तथाकथित सेनेचा मुख्यमंत्री केला ? तुम्ही दिलेला शब्द पाळला असता तर महाविकास आघाडी स्थापनच झाली नसती. त्यामुळे हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे. शिवसेनेशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असंही ठाकरे म्हणाले.
माझा राग मुंबईवर काढू नका
माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी बदलला त्याचं मला खरचं दुख होत आहे. ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही, तिथे कोण्या बिल्डरला आंदण देत नाही आहोत. तिथे पर्यावरणासाठी आवश्यक जंगल आणि वनराई होती, ती एका रात्रीत….. रात्रीस खेळ चाले हे त्याच आता ब्रीद वाक्य आहे, एका रात्री झाडांची कत्तल झाली. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.