राज्य विधीमंडळाचं उद्या विशेष अधिवेशन
मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील याची कुणालाच कल्पना नव्हती, असं नमूद करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत या घडामोडींसदर्भात आश्चर्य व्यक्त केलं. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली, सत्तेची कोणतीही खुर्ची मिळाली तरी ती स्वीकारायची असते, याचं उदाहरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारामुळं फडणवीस यांनी घालून दिल्याचं ते म्हणाले. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आनंदानं स्वीकारली नसल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरुन जाणवल्याचं त्यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे सत्तेला चिकटून राहिले नाहीत. या सत्तांतरात संजय राऊत यांना दोष देणं चुकीचं आहे, असं मत त्यांनी यावेळी नोंदवलं. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यामुळं हे सत्तांतर घडलं असल्याचा केला जात असलेला आरोप खोटा असल्याचं ते म्हणाले.
राज्य विधीमंडळाचं उद्या विशेष अधिवेशन
शपथविधिनंतर झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन उद्या शनिवारी आणि रविवारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे तर दुसऱ्या दिवशी बहुमत सिद्ध केलं जाईल. या बैठकीत राज्यातील खरीप हंगाम पीक, पाणी, पीक विमा परिस्थितीचं सादरीकरण करण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज्यातील विकास कामं, विविध प्रकल्प आणि समाज घटकाला न्याय देण्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.