7 जागांना मान्यता : 2009 पासुन सुरु होते प्रयत्न
अधिष्ठाता डॉ. खैरे, डॉ. लामतुरे यांच्या प्रयत्नांना यश
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थि रोग विभागात पदव्युत्तर शिक्षणास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग संस्थेची अखेर मान्यता मिळाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर 2009 पासुन या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी सतत प्रयत्न करण्यात येत होते, या मान्यतेसाठी आतापर्यंत सात वेळा इन्स्पेक्शन झाले होते. मात्र, आठव्या इन्स्पेक्शन नंतर अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे आणि अस्थि रोग विभागाचे प्रमुख डॉ. दिपक लामतुरे यांच्या संयुक्त प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थि रोग विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 7 जागांना मान्यता दिल्याचे पत्र 23 जूनला (पत्र जा.क्र. एन एमसीए) पीजी/2022) अधिष्ठाता यांना दिले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेला आता जवळपास 45 वर्षांपेक्षा जास्त कालावधी पुर्ण होत आला आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व विभागात जवळपास पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी मिळाली. अनेक विभागांना पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवून मिळाली. मात्र, अस्थि रोग विभागास अद्यापपर्यंत पदव्युत्तर शिक्षण सुरु करण्यास परवानगी मिळाली नव्हती.
‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थि रोग विभागास पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळावी, यासाठी पहिला प्रस्ताव 2009 साली तत्कालीन अस्थि रोग विभाग प्रमुख डॉ. धानीवाल यांनी दाखल केला होता. या नंतर डॉ. विजय बुरांडे यांनी या पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी मिळावी, यासाठी त्यांनी सर्व पातळीवर प्रयत्न केले होते. 2009 साली या पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी मिळण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर सात वेळा इन्स्पेक्शन झाले होते. मात्र, प्रत्येक इन्स्पेक्शन नंतर काहींनाकाही त्रुटी काढत या पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी मिळावी नव्हती. डॉ. धानीवाल आणि डॉ. विजय बुरांडे यांच्या कार्यकाळात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी विशेष प्रयत्न केले गेले होते.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थि रोग विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी 27 एप्रिलला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने पुन्हा आठव्या वेळेस इन्स्पेक्शन केले. यावेळी मात्र अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे आणि अस्थि रोग विभाग प्रमुख डॉ. दिपक लामतुरे यांनी मागील इन्स्पेक्शन मध्ये काढण्यात आलेल्या सर्व त्रुटींची पुर्तता करुन सदरील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले होते. या प्रयत्नांना मान्यता मिळाल्याने यश आले आहे.
‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार डॉ. भास्कर खैरे यांच्याकडे येताच त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन सांभाळतांना पदव्युत्तर शिक्षण विभागाकडे अधिक लक्ष दिले. वैद्यकीय महाविद्यालयात मेडिसीन आणि सर्जरी या विभागातील पदव्युत्तर शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या जागा वाढवून घेण्यात त्यांना यश मिळाले. गेली अनेक वर्षांपासून अस्थि रोग विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विभाग प्रमुख डॉ. दिपक लामतुरे यांच्या सहकार्याने सुरु केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.