पहिल्या टप्प्यातील 4974 घरकुलांना मंजुरी, दुसऱ्या टप्प्यात आणखी 5 हजार घरकुले प्रस्तावित
बीड : बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून जाता – जाता धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मंजुरी दिलेल्या 4974 ग्रामीण घरकुलांच्या निधी वितरणास मंजुरी दिली आहे.
बीड जिल्ह्यासाठी यावर्षी राज्यात सर्वाधिक, ग्रामीण 10 हजार व शहरी 5 हजार असे एकूण 15 हजार घरकुलांचे उद्दिष्ट धनंजय मुंडे यांनी निश्चित केले होते. त्यातून ग्रामीणच्या पहिल्या टप्प्यात 4974 घरकुलांच्या मान्यतेसाठी दि. 26 जूनला आयोजित बैठकीत धनंजय मुंडे यांनी मान्यता दिली होती.
जाता – जाता धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील 5 हजार गरजू कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याव्यतिरिक्त ग्रामीणसाठी आणखी 5 हजार तर शहरी भागासाठी देखील 5 हजार घरकुलांचे उद्दिष्ट आणखी प्रस्तावित आहे.
दरम्यान एकीकडे सत्तेची उलथापालथ सुरू असताना धनंजय मुंडे यांनी मात्र संयमी पण विकासात्मक भूमिका घेत बीड जिल्ह्यात विविध विभागांचा निधी खेचून आणण्याची भूमिका घेतली होती.
त्यांच्याकडील सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसह जलसंपदा विभाग, पर्यटन विभाग, ग्रामविकास विभाग यांसह अन्य विभागाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी बीड जिल्ह्यात आणण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरले आहेत.