‘अग्निपथ’ योजना बेरोजगार युवकांची क्रूर थट्टा करणारी – जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख

केंद्र सरकारची जुलमी ‘अग्निपथ’ योजना रद्द करा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे निवेदन

अंबाजोगाई : केंद्र सरकारची सर्वत्र टीका होणारी ‘अग्निपथ’ योजना ही बेरोजगार युवकांची क्रूर थट्टा करणारी आहे. त्यामुळे ही योजना रद्द करण्यात यावी, अशी मागणी करून या योजनेच्या विरोधात सोमवार, दिनांक 27 जूनला बीड जिल्हा काँग्रेसने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या योजनेतून युवकांना गाजर दाखविण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करीत असल्याचा आरोपही जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी केला. 

भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने नुकतीच ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे देशातील तरूणांचे भविष्य धोक्यात आले आहे. या निर्णयामुळे युवकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले, राष्ट्रीय नेत्या खासदार, रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष आसेफोद्दीन खतीब यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

निवेदन देण्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय लष्कराचे कंत्राटीकरण करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, देशाची संरक्षण व्यवस्था धोक्यात आणणारी ‘अग्निपथ’ योजना रद्द करा, पूर्वीप्रमाणे सैन्य भरती सुरू करा, अश्या घोषणाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळेस दिल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, ‘अग्निपथ’ योजनेस काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. अतिशय घृणास्पद योजना मोदी सरकारने आणली आहे. त्यांच्या विरोधात देशभरातील युवक पेटून उठले आहेत, लाखो युवक सैन्य भरतीसाठी अनेक वर्षे तयारी करत असतात. सैन्यामध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न युवकांचे असते. अनेक वर्षे त्यासाठी तो घालवतो आणि मोदी सरकार फक्त चार वर्षांत आर्मीमध्ये ठेवून त्यांना इतर नोकरीचे गाजर दाखवून वाऱ्यावर सोडणार असल्याचा त्यांनी आरोप केला. 

या निवेदनावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, शहराध्यक्ष आसेफोद्दीन खतीब, संजय काळे, शेख अकबर, अमर गायकवाड, समीर पठाण, समियोद्दीन मोमीन, ज्ञानोबाराव देशमुख, अशोक देशमुख, प्रविण देशमुख, समद कुरेशी, सतीश भगत, उत्तरेश्वर मुळे, सत्तार खाँ पठाण, शेख जमीर मोहियोद्दीन, शेख ताहेर सत्तार, अझहर पठाण, जुबेर पठाण, निसार शेख, मोहम्मद फैजान, रामेश्‍वर मुळे, शेख आयुब यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.