वंचित बहुजन आघाडीची मागणी : आयोगाला दिले निवेदन
अंबाजोगाई : नगरपरिषद निवडणूकीच्या हालचालींना वेग आला असून निवडणूक विभाग त्यासाठी जय्यत तयारी करित आहे. प्रभाग रचना, मतदार यादी प्रसिद्ध करणे ही कामं अत्यंत वेगाने सुरू आहेत. परंतू, अंबाजोगाई शहरातील विविध प्रभागात असणाऱ्या मतदार याद्यात बोगस मतदारांची नावे डोकेदुखी ठरत आहे. निवडणूक विभागाने तात्काळ ही बोगस नावे रद्द करावीत, अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे. निवडणूक विभाग यावर काय कार्यवाही करेल, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही शहरातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये असलेल्या बोगस दुहेरी मतदान यादीतील नावे तात्काळ रद्द करण्यात यावीत, या मागणीसाठी मुख्याधिकारी यांच्या मार्फत निवडणूक आयोगास निवेदन देण्यात आले. यापूर्वीही असे दोन निवेदन दिनांक 30 नोव्हेंबर 2021 व दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले होते.
निवडणूक विभागास देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक येत्या काही महिन्यात होऊ घातल्या आहेत. त्या दृष्टीकोनातून आपण 21 जानेवारी 2022 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. याच वेळेस आपल्या निवडणूक विभागाने आदेश जारी करून सांगितले आहे की, 27 जून 2022 पर्यंत नवीन नाव नोंदणी, नाव वगळणे, स्थलांतर करणे व मतदारांची असणारी दुबार नावे वगळणे व आक्षेप घेणे असा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच अंतिम मतदार यादी आपण दिनांक 1 जुलैला प्रसिद्ध करणार आहोत. तरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक 15 च्या प्रारूप मतदार यादीमध्ये मयत नावे, परगावी स्थलांतरीत झालेल्या व त्याच ठिकाणी कायमच्या वास्तव्यास असलेल्या मतदारांची नावे नोंद आहेत.
तसेच डबल – डबल ग्रामीण भागात व दोन – दोन विधानसभा मतदार संघात नोंद असलेल्या मतदारांची नावे, परजिल्ह्यातील मतदारांची नावे, अंबाजोगाई शहरातून स्थलांतरीत झालेल्या / बदली झालेल्या पोलीस कर्मचारी वसाहतीतील नावे, प्रभागाच्या हद्दीत वास्तव्यास नसलेली व प्रस्तापित सत्तेतील पुढारी, नेते यांनी आपल्या सोयीचे म्हणून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी नोंद करून घेतलेली दुबार नावे नोंद आहेत. ही नावे अंबाजोगाई शहरात जवळपास 4 ते 5 हजार असण्याची शक्याता आहे. ही शासनाची, जनतेची फसवणूक आहे.
मुळात निवडणूक प्रारूप यादी जाहीर झाल्यास निवडणूक अधिकारी, तहसीलदार यांनी बैठक घेऊन सूचना देणे आवश्यक होते. परंतू, तहसीलदार, निवडणुक अधिकारी यांनी ही निवडणूक संदर्भाची सर्वपक्षीय बैठक दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित केली. यावेळी आपल्या निवडणूक आदेशाची सर्व माहिती दिली गेली. परंतू, अंबाजोगाई शहरात व विशेषता प्रभाग क्रमांक 15 मध्ये असणारी बोगस दुबार नोंद असलेली, स्थलांतरीत मतदारांची जवळपास ही नावे 968 आहेत आणि शहरात 4 ते 5 हजार असण्याची शक्याता आहे. ही नावे वगळण्याची जबाबदरी आपल्या निवडणूक विभागाणे घेतली नाही. मतदारांचे नाव नोंद करून घेणे ही आपली जबाबदारी आहे, मग दुबार नोंद असलेली, बोगस स्थलांतरीत, मयत मतदारांची नावे वगळण्याची जबाबदरी कोणाची आहे ? हा प्रश्न आम्हाला अनुउत्तरीत आहे. ही नावे न वगळण्यामागे कोणते महत्वाचे कारण आहे. ही नावे आपण का वगळीत नाहीत.
तरी या निवेदनाद्वारे आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करत आहोत की, संबंधीत बोगस स्थलांतरीत, मयत, प्रभागाच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या मतदाराबाबत आपणास निवेदन देण्यात आले होते. परंतू, आपण त्या निवेदनाच्या बाबतीत कुठलीही कार्यवाही केली नसल्याने व त्या नावाची पडताळणी करून बाद केले नसल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे.
अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील मतदारांची नावे वगळूनच अंतिम मतदार यादी व शहराची अंतिम प्रभाग रचना जाहीर करून पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडावी. याच प्रकारे पूर्ण अंबाजोगाई शहरात हजारो नावे ही बोगस स्थलांतरीत, मयत, प्रभागाच्या बाहेर वास्तव्यास असलेली आहेत. याची आपण सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, ही विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद मस्के, शहर महासचिव नितीन सरवदे, वंचितचे प्रवीण मिसाळ, धर्मराज चौरे आदि उपस्थित होते.