तीन अश्व, 700 वारकऱ्यांचा पालखीत समावेश
अंबाजोगाई : शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे टाळ – मृदुंगाच्या गजरात आज शनिवार दिनांक 25 जूनला दुपारी शहरात आगमन झाले आहे. पालखीच्या स्वागतासाठी अंबाजोगाई नगरी सज्ज झाली होती. ठिकठिकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात भाविकांनी पालखीचे स्वागत करत दर्शन घेतले. त्यामुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. महिलांनीही पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या होत्या.
संत गजानन महाराजांची पालखी अंबाजोगाई येथे अनेक वर्षांपासुन येत आहे व त्या पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात भाविकांच्या वतीने करण्यात येते. त्याच बरोबर या पालखीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमही शहरात घेतली जातात.
6 जूनला आषाढी वारीसाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव येथुन प्रस्थान झाले आहे. आज 25 जूनला पालखीचे अंबाजोगाईत आगमन झाले. पालखीचे हे 53 वे वर्ष असून शेगाव येथून तीन अश्व, 700 वारकरी पालखीत सहभागी आहेत. यात काही टाळकरी तर काहींच्या हातात भगवा पताका आहे. संत गजानन महाराज पालखी सोहळा हा अत्यंत शिस्तबद्ध म्हणून ओळखला जातो.
पालखीचा मुक्काम अंबाजोगाई शहरातील दत्त मंदिर येथे होणार असून रात्री भजन – कीर्तन कार्यक्रम होणार आहेत. तर सकाळी 8 वाजता पालखीचे पंढरपूरसाठी अंबाजोगाई शहरातून प्रस्थान होईल.