संत गजानन महाराजांच्या पालखीचा मार्ग बदलला : भक्तांमध्ये नाराजी

अंबाजोगाई : शेगाव येथून पंढरपुरकडे निघालेल्या संत गजाजन महाराज पालखीचे आगमन शनिवार, दि. 25 जूनला होत असून या पालखीचा मार्ग पुर्वी प्रमाणे न राहता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. पालखीचा मार्ग बदलल्याने शहरातील भक्तांमध्ये नाराजी पसरली असून पालखीचा मार्ग पुर्वीचाच ठेवावा, यासाठी भक्त उद्या उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत.

संत गजानन महाराजांची पालखी अंबाजोगाई येथे अनेक वर्षांपासुन येत आहे व त्या पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात भाविकांच्या वतीने करण्यात येते. त्याच बरोबर या पालखीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमही घेतली जातात. 

हौसिंग सोसायटीमधील दत्त मंदिरात या पालखीचा मुक्काम असतो व दुसऱ्या दिवशी ही पालखी हौसिंग सोसायटीमधील दत्त मंदिरातून लोखंडी सावरगाव मार्गे कळंबकडे प्रस्थान करते. पुर्वी शहरात पालखी आल्यानंतर संत भगवानबाबा चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, मांडवा रोड, खडकपुरा, देशपांडे गल्ली, बाजीप्रभू चौक, तानाजी मालुसरे चौक, भट गल्ली मार्ग प्रस्थान करायची.

मात्र, सदरिल मार्ग बदलून आता संत भगवानबाबा चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक, तहसील कार्यालय, पाटील दवाखाना, पाटील चौक, मंडी बाजार, योगेश्वरी मंदीर, गुरूवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे दत्त मंदीर सोसायटी, अंबाजोगाई येथे मुक्काम होणार आहे. पालखीचा पुर्वीचा मार्ग बदलल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालखीचा मार्ग पुर्वीचाच ठेवावा, अशी मागणी भक्तांतून करण्यात येत आहे. ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌