अंबाजोगाई : शेगाव येथून पंढरपुरकडे निघालेल्या संत गजाजन महाराज पालखीचे आगमन शनिवार, दि. 25 जूनला होत असून या पालखीचा मार्ग पुर्वी प्रमाणे न राहता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. संत गजानन महाराज पालखीच्या स्वागतासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पालखी संयोजकांनी केले आहे.
संत गजानन महाराजांची पालखी अंबाजोगाई येथे अनेक वर्षापासुन येत आहे व त्या पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात भाविकांच्या वतीने करण्यात येते. त्याच बरोबर या पालखीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमही घेतली जातात.
हौसिंग सोसायटीमधील दत्त मंदिरात या पालखीचा मुक्काम असतो व दुसऱ्या दिवशी ही पालखी हौसिंग सोसायटीमधील दत्त मंदिरातून लोखंडी सावरगाव मार्गे कळंबकडे प्रस्थान करते. शनिवारी (दि.25) या पालखीचे स्वागत भगवानबाबा चौकात केले जाणार आहे. त्यानंतर ही पालखी संत भगवानबाबा चौक मार्गे अण्णाभाऊ साठे चौक, आंबेडकर चौक, बसस्थानक, तहसील कार्यालय, पाटील दवाखाना, पाटील चौक, मंडी बाजार, योगेश्वरी मंदीर, गुरूवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे दत्त मंदीर सोसायटी अंबाजोगाई येथे मुक्काम होणार आहे.
रविवार, दि. 26 जून 22 रोजी श्रींची पालखी पुढील मार्गासाठी राजीव गांधी चौक ते यशवंतराव चौक मार्गे लोखंडी सावरगावकडे मार्गस्थ होईल. संत गजानन महाराज पालखीच्या दर्शन सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.